दीदी
दीदी

दीदी

प्रतीक धानमेर

दीदीला मी फक्त तीनदा भेटलो. पहिली भेट नम्रतामुळे शक्य झाली. तिचे हे ऋण फेडता येणे शक्य नाही. पहिल्याच भेटीत दिदीला दिलेला बांबू पाउच दीदी 20 मिनिटे न्याहाळत बसली. एकेक वीण कशी आहे हे डोळ्यांनी आणि स्पर्शाने अनुभवत होती. “This is beautiful”… प्रत्येक डिटेल पाहिल्यावर ती हे एकच वाक्य बोलत होती. मग मी, लक्ष्मी आणि दिदीने जेवताना येथेच्छ गप्पा मारल्या. शाश्वत वास्तुकलेचा भक्कम पाया रचणारी दीदी आम्हाला मात्र एखाद्या नवख्या विद्यार्थ्याप्रमाणे मातीच्या बांधकामाचे प्रश्न विचारत होती. मातीची बोटल टेस्ट कशी करतात हे तिने मला शिकवायला सांगितलं. मी बॉटल टेस्ट करत असताना दीदी बारकाईने पाहत होती, आणि मध्ये मध्ये लक्ष्मीला सांगायची-” हे बघ लक्ष्मी, आपण इथेच चुकलो”. दिदींसारख्या ऋषितुल्य वास्तुविशारदाने स्वतःची चूक इतक्या सहज पणे मान्य करणे माझ्यासाठी अविश्वसनीय होते. लक्ष्मी मला नेहमी सांगायची-” दीदी जागी असली म्हणजे ती काहीतरी काम करत असणार, आराम करणं तिला जमायचेच नाही”. मी दिदीला एकदा म्हंटल- दीदी, जरा विश्रांती घेत जा”- त्यावर ती हसून म्हणायची – प्रतीक, किती गोष्टी बाकी आहेत, किती घरे बांधायची आहेत, मातीच्या बांधकामाचा प्रसार करायचा आहे, सोलर चुलीची माहिती लोकांना द्यायची आहे, भारतीय स्वयंपाकावर पुस्तक लिहितेय.. कितीतरी deadline आहेत, आणि माझं वय बघता त्या खरोखरच deadline आहेत”. ती असे बोलताच मी  आणि लक्ष्मीने एकमेकांकडे पाहिले. मृत्यूला दिदीने फार आधीच स्वीकारलं होत. मृत्यूबद्दल ती फार सहज बोलून जायची. आणि आपल्याकडे असलेला ज्ञानाचा वसा जास्तीजास्त लोकांना मिळावा म्हणून ती सतत आपल्या विचारांचे रेकॉर्डिंग करायची.

तिच्या बागेतील प्रत्येक झाडाला ती स्पर्श करायची. कोणत्या झाडाला किती पाणी द्यावे, किती खत द्यावं हे फार बारकाईने पहायची. तिची बाग नेहमीच अगदी तिला हवी तशी व्यवस्थित असायची. निसर्गावर दिदीचे इतके प्रेम होते की दिदीच्या बागेत निसर्गही दिदींच ऐकायचा… दीदी सांगेल तस वागायचा…

दीदी बरोबर झालेल्या तीनही भेटीत आम्ही कधी वास्तुकलेबद्दल बोललो असू असं आठवतच नाही. दिदीसाठी वास्तुकला ही जगण्याचा भाग होती. दिदीने वास्तूला व्यक्तिरुप दिल होत. घर म्हणजे व्यक्तीच. घर निर्जीव नसतेच. ती घराच्या आणि घरातल्या व्यक्तींच्या नात्याला अनन्यसाधारण महत्व देते. तिच्या मते घरालासुद्धा स्वभाव असतो. घरातला प्रकाश , खोली, वारा ह्यावर तो स्वभाव अवलंबून असतो. अभिकल्प कागदावर रेखाटताना दिदीला पाहणे म्हणजे पर्वणीच. मायकलांजेलो मूर्ती बनवताना  किंवा तानसेन गाताना असाच मग्न होत असेल का ? दीदी घराची निर्मिती ह्याच तन्मयतेने करायची. मध्येच लक्ष्मीकडे पाहून बोलायची-” ह्या खिडकीतून सूर्य इथे जमिनीवर येईल आणि संध्याकाळ होई पर्यंत इथून तिथे लहान मुलासारखा घरात बागडेल”. दिदीने वारा, प्रकाश ह्यांना घरात बागडायला भाग पाडले. अशी एखादी कल्पना तिच्या डोक्यातून कागदावर आली की तिला होणारा आनंद पाहण्यासारखा.

दीदीच्या घरात पहिल्यांदा प्रवेश केला तो स्वयंपाकाच्या वस्तूंनी आणि भांड्यांनी गजबजलेल्या स्वयंपाकघरातून. बंद कपाटे दिदीच्या घरात नाहीच. तरी प्रत्येक वस्तू जागच्याजागी. ह्यावर दीदी म्हणते- “आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो, तेव्हा ती व्यक्ती संकोच न करता, मनात काहीही लपवून न ठेवता आपल्याशी बोलू लागली की आपण त्या व्यक्तीशी जोडले जातो. घराचेही तसेच आहे. माझ्या घरात जे आहे ते उघड आहे. त्यात काहीच लपवलेले नाही. ते पारदर्शी आहे”. दीदी हे सारं काही इतकं सोप्प करून सांगते. घर बांधताना घर बांधणाऱ्याने मातीला स्पर्श करणे , मातीला समजून घेणे महत्वाचे हे ती आवर्जून सांगते. दीदी म्हणायची – ” इथली लोक सिमेंटला मसाला बोलतात, त्यामुळे बांधकामात सिमेंट मसल्याप्रमाणेच वापरायचं, आपण जेवण फक्त मसाल्याने बनवत नाही ना. नुसता मसाला खाणे आरोग्याला चांगलं नाही.. आणि मसाला नाही वापरला तरी चालेल की, कधी कधी फळे, फळभाज्या आपण कच्च्या खतोच ना, आणि ते आरोग्याला सुद्धा चांगलं असत… मातीचसुद्धा तसंच आहे”… दीदी हे खोल ज्ञान इतकं सोपं करून सांगते की ऐकणाऱ्याला ते नुसतं समजत नाही तर ते त्यांच्यात खोलवर रुजत. दिदीच्या बोलण्यात एक आध्यात्मिकता होती. ज्यामुळे तिला ऐकणं हा एक सुखद अनुभव असायचा.

“प्रतीक, तुला माहीत आहे मला माती का आवडते ? ..ती सुकायला वेळ लागतो. मग ती सुकेपर्यंत तू त्यावर हात फिरवून त्याला आकार देऊ शकतो. तुझ्याकडे नेहमीच थोडा जास्त वेळ असतो. सिमेंटसारखी ती लगेच सुकून टणक होत नाही.” दिदीचे हे मृदामय विचार मनाचा ठाव घेतात.

दिदीबरोबर शेवटची भेट 2019 च्या उन्हाळ्यात झाली. मी अचानक जायचे ठरवले. काही पूर्वकल्पना न देताच दिदीच्या घरी धडकलो. दीदी नेहमी प्रमाणे लक्ष्मीला एका घराचे डिटेल समाजावत होती. मला अचानक पाहून दीदी खूप खुश झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाने ती निराश होती. मी येताच ती म्हणाली- ” बर झालं तू आलास प्रतीक, तुला पाहिलं की खूप हायस वाटत. तुम्हीच ह्या देशाला योग्य दिशा देऊ शकता. तुम्हाला असं काम करताना पाहिलं की वाटत आता मी कायमस्वरूपी विश्रांती घेऊ शकते”. दीदी जेव्हापण असं बोलायची, तेव्हा हृदयाचा ठोका क्षणभर चुकायचा.

दिदीला प्लास्टिक जराही आवडत नाही, पण चॉकोलेट फार आवडायचे. चॉकोलेट प्लास्टिक च्या वेष्टनात येते म्हणून तिला खूप वाईट वाटायचे. एकदा कुडाच्या भिंतीचा विषय निघाल्यावर तिनेच मला सांगितलं- ” प्रतीक, मला चॉकोलेट खूप आवडतं, त्याचे प्लास्टिक मी जमा करून ठेवते आणि कुडाच्या भिंतीमधील कॅव्हिटी मध्ये इन्सुलेशन म्हणून वापरते”. हे सांगताना ती खट्याळ हसते. तिला माहीत आहे की प्लास्टिकच्या पुनर्वापराचा हा अगदी योग्य पर्याय नाही पण त्यातल्या त्यात तिने चॉकोलेट खाण्याचा पर्याय शोधलेला असतो त्याचा आनंद. दिदीच्या स्वभावातील बालपण कधी संपले नव्हतेच.

दीदीने एकदा चर्चा करता करता अचानक सांगितले-” प्रतीक, तुम्ही तुमच्या भागातल्या आदिवासी घराच्या कुडाच्या भिंतींचा अभ्यास करा, त्याचा प्रसार करा, कुडाच्या भिंती बांधण्याचे तंत्रज्ञान जिवंत राहायला हवे.” दीदी हे सहज बोलून गेली. पण हा आयुष्यभराचा कानमंत्र आहे हे मला आणि शार्दूलला समजले.

दिदीच्या बागेत बसलो असताना, दिदीला समजले की मी माझ्या बासऱ्या घेऊन आलो आहे, तिने लागलीच मला बासरी वाजवण्याची विनंती केली. खरंतर मी शिकाऊ बासरी वादक, तरीही ती डोळे मिटून मी जे काही वाजवतोय ते ऐकत होती.

त्या दिवशी रात्री मला बसने दिल्लीला निघायचे होते. भुकेल्या पोटी जाऊ नकोस असं म्हणून दीदी स्वतः स्टूल घेऊन स्वयंपाक घरात बसली आणि चार पराठे माझ्यासाठी बनवले. फडताळावरची स्वतः बनवलेल्या प्लम जॅम ची बाटली काढून माझ्याकडे दिली. त्यावेळी निघताना माझी मनःस्थिती फार द्विधा झाली होती. जावेसे वाटत नव्हते. पराठ्यांची पिशवी हातात धरून मी दिदीच्या पाया पडून निघालो.

5 जुलै माझ्या आईचा वाढदिवस. दुपारी आईला ओवाळून शुभेच्छा देऊन मी ट्रेकसाठी शार्दूलच्या गावी निघालो. दुपारी डोंगरावर चढतानाच दीदी गेल्याची बातमी आली आणि सगळं सुन्न झाले.

दिदीच वय झालंय हे मान्य होत पण तरीही अशी बातमी पचवणं शक्य नव्हतं. दिदीला परत एकदा भेटायचं होत. तिच्याकडून जगण्याची कला शिकून घ्यायची होती.

दिदीच्या जाण्याने नक्की काय झाले?

लाखो पुस्तकांच्या ग्रंथालयाला आग लागून ते बेचिराख झालं तर काय होईल ? त्या ग्रंथालयाच्या ग्रंथातील ज्ञानाचे काय होईल … दीदी असेच एक ग्रंथालय होती. दिदीच्या संपर्कात आलेल्या कित्येक व्यक्तींनी ह्या ग्रंथालयालतील काहीसे ग्रंथ वाचले असतील. त्यातूनही काहीश्या पानांचा बोध त्यांना झाला असेल.. पण तरीही ह्या ज्ञानाचे पावित्र्य इतके गहिरे आहे की त्यातून केवळ चांगल्याचीच निर्मिती होणार. तिच्या हाताखाली तयार झालेले वास्तुशिल्पी अनुज्ञा, लक्ष्मी आणि अमोल सारख्या वास्तूविषारदाचे काम पाहिले की ह्याची प्रचिती येते. दिदीच्या  जाण्याने समाजाचे, ह्या जगाचे काय नुकसान झाले आहे हे समजावणे कठीण आहे. निसर्गकेंद्रीत वास्तुकलेतून जीवनाचे मर्म सांगणारा … आम्हा सारख्या नवोदितांना ह्या ज्ञानमार्गाची दिशा दाखवणारा एक ध्रुवतारा क्षणात नाहीसा व्हावा .. असे काहीसे झाले आहे … ही पोकळी भरून निघणे केव्हाही शक्य नाही.

दीदी जिथे कुठे असेल, तिथेही स्वर्गाची निर्मिती करण्यात दंग असेल…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

%d bloggers like this: